Krishna Satpute : The God of Tennis Cricket

फलंदाजी करणाऱ्या संघाला एक ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी 23 धावा हव्या होत्या. आव्हान तसे खूप कठीण होते परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाला आपण जिंकू शकतो याची जणू खात्रीच होती कारण हे तसेच होते. कारण फलंदाजी करणारा फलंदाज ही तितकाच खतरनाक आणि भरवशाचा होता. पहिला चेंडू निर्धाव जाऊनही त्या फलंदाजाने पुढील पाच चेंडूत चार षटकार मारून हा सामना  एक हाती जिंकून दिला. त्याचे नाव होते कृष्णा लक्ष्मण  सातपुते. ‘ क्रिकेटचा देव’ असा शब्द उच्चारला की सर्वांच्या डोळ्या समोर Sachin Tendulkar यांचा चेहरा आल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राचा हा हिरा जगभरात क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो. सचिन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही खेळाडूला आपण The God of  cricket म्हणू शकत नाही. परंतु  Krishna Satpute नावाच्या वादळाने आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलं. टेनिस क्रिकेट विश्वावर ज्याने अधिराज्य गाजवल, टेनिस क्रिकेटला नवीन ओळख निर्माण करून दिली. म्हणूनच त्याला God of tennis cricket असे म्हटले जाते. अशा कुर्डूवाडी  सोलापूरच्या कृष्णा सातपूतेचा संघर्ष सुद्धा तितकाच प्रेरणादायी आहे. चला तर पाहूया त्याचा संपूर्ण जीवन प्रवास.

कृष्णाचा जन्म 

कृष्णा सातपुते याचे आयुष्य संघर्षमयी होते. भारतानं1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला आणि त्याच वर्षी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील ढवळस रेल्वे स्थानकाच्या रेल्वे क्वार्टरमध्ये कृष्णा सातपुते याचा जन्म  1 मे 1983  रोजी झाला. कृष्णाचे वडील रेल्वेमध्ये कार्यरत होते. त्यामुळे ढवळस रेल्वे स्थानकाच्या हद्दीत असणाऱ्या रेल्वे क्वार्टरमध्ये त्यांचे संपूर्ण बालपण गेले. लहान वयात कृष्णाचा स्वभाव खोडकर होता. मस्ती करणे, झाडावर चढणे, लपून बसणे, खोड्या काढणे त्यामुळे अनेक वेळा त्याने वडिलांचा सुद्धा खूप मार खाल्ला आहे.

कृष्णाचे शालेय शिक्षण 

               कृष्णाचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण ढवळस गावातील जय जगदंबा विद्यालय या शाळेत झाले. त्यानंतर वडिलांची कुर्डूवाडी मध्ये बदली झाली व पुढील शिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, कुर्डूवाडी येथे पूर्ण झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण के.एन.भिसे कुर्डूवाडी या महाविद्यालयात त्याने घेतले. या कालखंडात त्यांनी क्रिकेटवर असलेले प्रेम जराही कमी होऊ दिले नाही. शालेय जीवनात तो फार रमला नाही, कारण मैदानात चौकार आणि षटकार खेचण्यात जो आनंद त्यांना मिळत होता, तो आनंद शाळेच्या चार भिंतीमध्ये त्याला कधी मिळाला नाही. इयत्ता 12 वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर बहूदा त्यांनी पुढे शिक्षण घेतले नाही.

                  कुर्डूवाडीमध्ये कृष्णा सातपुते याच्या क्रिकेट कारकि‍र्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. कारण शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्याने लहान असतानाच मोठ्या पोरांमध्ये खेळायला सुरुवात केली होती. त्याच्या फलंदाजीचे तेव्हाही सर्वांना कौतुक होते. निर्भीड आणि धमाकेदार फटकेबाजी करत असल्यामुळे चांगल्या चांगल्या गोलंदाजांचा सुद्धा त्याने लहान वयात घाम काढला आहे. सहावीत असताना सिनियर खेळाडूंनी मारलेले बॉल आणण्याचे काम कृष्णा करत होता. त्याच्या मनात क्रिकेट खेळण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे त्याने शाळेतले मित्र आणि गावातील मित्र याची टीम बनवली व रबर बोलणे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी सर्फराज आणि  रंजीत या दोन मित्रांनी ती टीम स्पॉन्सर केली होती. त्यावेळी जय हिंद नावाची मोठी टीम त्या भागात खेळत होती. त्यांच्याविरुद्ध कृष्णा ने अशी काही फटकेबाजी केली की त्यांनी त्याला आपल्या टीम मध्ये खेळण्यास बोलावले.

शालेय क्रिकेट ते प्रतीक XI  डिंगडाँग पर्यंतचा प्रवास 

जय हिंद संघाकडून खेळताना कृष्णाने अनेक स्पर्धा गाजवल्या. अशातच इंदापूर येथील स्पर्धेत पुण्यातील प्रसिद्ध आणि बाप संघ म्हणून ओळख असलेल्या प्रतीक XI संघाविरुद्ध त्याला खेळण्याची संधी मिळाली होती. या संधीचे त्याने सोनं केलं आणि प्रतीक XI मधील दिग्गज गोलंदाजांवर जबरदस्त प्रहार करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.त्याने चौफेर फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. खऱ्या अर्थाने कृष्णाच्या या खेळीमुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सामना झाल्यानंतर प्रतीक XI संघाचे मालक  विशाल कांबळे आणि संदीप जगताप यांनी स्वत: कृष्णाशी संपर्क साधून त्याला संघातून खेळण्यासाठी आमंत्रित केले.त्यावेळी कृष्णा कडे मोबाईल नव्हता. शेजारच्या टेलिफोन  वरून कॉल करून त्याला खेळण्यासाठी बोलावत.  त्या दिवसापासून कृष्णाच्या टेनिस क्रिकेट पर्वाला सुरुवात झाली.

एकाच महिन्यात कृष्णा पोरका झाला अन्…

एकीकडे कृष्णाची क्रिकेट कारकिर्द बहरत होती. मात्र दुसरीकडे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या वडिलांना कॅन्सरचे निदान झाले आणि कुटुंबाला मोठा हादरा बसला. कृष्णाने वडिलांवर उपचार करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, कर्ज काढून अमाप खर्च केला. परंतु त्याचे वडील वाचू शकले नाहीत. 2003 मध्ये त्यांचे  निधन झाले. कृष्णा या दु:खातून सावरणार तोच वडिलांच्या निधनाचा आईला जबर धक्का बसला होता. त्या दु:खातून त्याची आई ही सावरू शकली नाही आणि वडीलांच्या पाठोपाठ आईचे सुद्धा त्याच महिन्यात निधन झाले. एकाच महिन्यात कृष्णा पोरका झाला. एकीकडे आई वडीलांच्या मृत्यूचा शोक, दुसरीकडे त्याची पत्नी गर्भवती होती त्यांचं टेंशन. वडिलांच्या आजारपणात बराच पैसा खर्च झाला होता. त्यामुळे कर्जही खूप झाले होते. त्यामुळे त्याने वाटेल ते काम करायला सुरुवात केली. बिगारी, रोजंदारी मजूर म्हणून सुद्धा त्याने काम केले. अनेक संकटे चहूबाजूंनी घोंघावत होती. परंतु कृष्णाने क्रिकेट खेळणे काही थांबवले नाही. एका मुलाखतीत कृष्णाने सांगितले होते की, त्याच्यावर एक वेळ अशी आली होती. जेव्हा त्याच्याकडे बायकोला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा भंगार विकून त्याने पैसे आणले होते. त्याचा आयुष्यातील ही पहिली आणि शेवटची चूक होती, असे त्याने तेव्हा म्हटल होतं. त्यानंतर कृष्णाने ती चूक पुन्हा कधीच केली नाही.

क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट…

Image source credited from Google.

क्रिकेट वेड्या कृष्णाने आपले क्रिकेट प्रेम कायम ठेवत खेळात सातत्य ठेवलं आणि पुण्यामध्ये प्रतीक XI कडून खेळायला सुरुवात केली. याच काळात तो पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील एका कंपनीमध्ये नोकरी करू लागला. मात्र मैदानावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणारा कृष्णाला ऑफिसच्या चार भिंती कोठडी प्रमाणे भासत होत्या. एकदा त्याचा बॉस त्याला ‘आप काम नही कर सकते आप सिर्फ क्रिकेट ही खेलो.’ असा म्हणाला होता. तेंव्हा पासून कृष्णाने पूर्ण वेळ क्रिकेटमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि मैदान गाजवायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या खेळाचा स्तर उंचावत गेला. त्याच्या फलंदाजीने त्याने टेनिस क्रिकेटमधील मातब्बर गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढले. त्याच्या फलंदाजीची क्रेझ तरुणांमध्ये निर्माण झाली. फक्त कृष्णाची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करू लागले. त्याने सुद्धा चाहत्यांचा हिरमोड केली नाही. अनेक शतकं, अर्धशतक ठोकून त्याने आपल्या फलंदाजीचा धडाका कायम ठेवला. 2019 मध्ये गोव्याच्या एका मोठ्या स्पर्धेत प्रतिक 11 विरुद्ध रायगड हे दोन्ही संघ फायनलमध्ये एकमेकांच्या विरुद्ध येऊन ठेपले. दोन्ही बाप संघ आमने सामने आल्यामुळे चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी होती. फायनल ला प्रतीक XI संघाला जिंकण्यासाठी 8 षटकांमध्ये 88 धावा करायच्या होत्या. मात्र प्रतीक XI ची सलामीची जोडी आणि मधली फळी कोसळली होती. प्रतीक XI चे 5 गडी 17 या धावसंख्येवर बाद झाले होते. त्यामुळे सर्व भार कृष्णाच्या खांद्यावर आला होता. कृष्णाने या परिस्थितीमध्ये सुद्धा न डगमगता तुफान फलंदाजी केली. चौकार आणि षटकारांची त्याने आतषबाजी केली आणि 1 षटक राखून प्रतीक XI संघ विजयी झाला.

कृष्णा सातपुते मुळे लोकांचा टेनिस क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला
Image credit source from Google ISPL.

इंग्लंडमध्ये झालेल्या ICC CRIO चषकामध्ये भारत विरुद्द पाकिस्तान सामन्यामध्ये त्याने भारताच्या टीमचे सदस्य होता. तसेच 2022 साली झालेल्या सहा संघांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्यावर भारताच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, युएई, ओमान आणि कॅनडा या सहा देशांचा समावेश होता. एकेकाळी कृष्णाने स्वतः म्हटले होते की, टेनिस क्रिकेट ला एखादे मोठे व्यासपीठ मिळेल आणि टेनिस क्रिकेट ला सुगीचे दिवस येतील. आणि खरच सध्या ISPL मुळे टेनिस क्रिकेट ला सुगीचे दिवस आले आहेत. आज रोजी कृष्णाने आपली चाळिशी जरी ओलांडली असली तरी या ISPL ही त्याच्या  नावाची चर्चा नेहमी होत असते. वाघ जणू म्हातारा जरी झालेला असला तरी त्याच्या नावाची दहशत नेहमीच असते. याचीच प्रचिती ज्यावेळी कृष्णा सातपुते मैदानात उतरतो त्यावेळी होते. म्हणूनच त्याला  कुर्डूवाडी चा डॉन म्हणतात.

कृष्णा सातपुते आणि विक्रम

  • टेनिस क्रिकेटमध्ये कृष्णाने भारताकडून खेळताना सर्वाधिक 23 शतके ठोकली आहेत. त्याचबरोबर देशांतर्गत टेनिस क्रिकेटमध्ये 25 हून अधिक शतकांची नोंद त्याच्या नावावर आहे.
  • 2001 मध्ये एकाच सामन्यात 14 षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम त्याने केला होता.
  •  एकाच षटकात 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने आतापर्यंत तीन वेळा केला आहे.
  • त्याने आतापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये अनेक पारितोषिकं जिंकली असून त्यामध्ये अनेक दुचाकींचा समावेश आहे.
  • सर्वात मोठी गोष्ट म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम फक्त कृष्णा सातपुतेच्या नावावर आहे.

कृष्णा सातपुतेने आपल्या टेनिस क्रिकेट कारकि‍र्दीत अनेक वेळा एकहाती सामने आपल्या संघांना जिंकून दिले आहेत. त्याच्या बॅटमधून निघणारे चौकार आणि षटकार पाहण्यासाठी चाहते मैदानांमध्ये मोठ्या संख्येने तेव्हाही गर्दी करत होते आणि आजही गर्दी करत आहेत. चाहता वर्ग देशाच्या कानाकोपऱ्यात असल्यामुळे देशभरातली विविध संघ त्याला खेळण्यासाठी आमंत्रित करतात.

कृष्णा सातपुते च्या सर्वोत्तम खेळी –  best knock by Krishna Satpute

  1. कर्नाटकातील कारवारमध्ये खेळत असताना त्याने 57 चेंडूमध्ये 159 धावांची धुवाधार खेळी केली होती. त्याचा आक्रमक पवित्रा पाहून विरुद्ध टीमसह चाहते सुद्धा आवाक झाले होते.
  2. कर्नाटक मधील बेळगाव येथे त्या काळची सर्वोत्तम असलेली दौंडच्या टीम बरोबर फायनल मॅच मध्ये कृष्ण सातपुते ने एक अजरामर खेळी केली होती. जिंकण्यासाठी दहा षटकांमध्ये 110 धावांची गरज असताना 35 वर 5 विकेट जाऊनही सतीश पठारे आणि विजय पावले सारख्या मातब्बर गोलंदाजांचा चा खरपूस समाचार घेत कृष्णाने 65 धावांची खेळी केली आणि हा सामना एक ओव्हर राखून जिंकला.
  3. रतन बुवा ट्रॉफी मध्ये त्या काळची सर्वोत्तम असलेली लॉईड टीम बरोबर 78 धावांची गरज असताना वैयक्तिक नाबाद 62 धावांची खेळी करून कृष्णा सातपुते ने आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता.
  4. कोलकता मधील एका लोकल टीमने त्यांच्या टीम मध्ये खेळण्यासाठी कृष्णाला बोलावले होते. तेथील  बेस्ट टीम बरोबर त्यांची मॅच होती जिंकण्यासाठी 117 धावांची आवश्यकता असताना 36 वर 6 विकेट जाऊनही कृष्णाने 75 धावांची अफलातून केली त्यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅटसमन असे सर्वच पुरस्कार मिळाले होते.
केलेले उपकार जाणणारा कृष्णा सातपुते – 

कृष्णा सातपुते याने क्रिकेटच्या दुनियेत बरेच विक्रम केले आहेत. खूप नाव कमावले आहे. परंतु संकटकाळी त्याला ज्यांनी मदत केली होती त्यांना तो कधीच विसरत नाही. 2012 साली ज्यावेळी त्याने स्पोर्ट्स कपड्यांचे दुकान चालू केले होते त्यावेळी मयूर स्पोर्ट्स चे मालक राजू भालेकर यांनी त्याला आर्थिक पाठबळ दिले होते व कीट साठी सपोर्ट केला होता. याचे महत्त्व तो नेहमी सांगत असतो. तसेच संतोष नाणेकर यांचे tennis cricket.in, अजय दादा दूधभाते यांचे crickelife.in , तसेच तारीक भाई यांचे 77.in यांद्वारे टेनिस क्रिकेटचे लाईव्ह प्रक्षेपण देशांतर्गत जसे की दिल्ली मुंबई कर्नाटक या ठिकाणी शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर दुबई, कतार आणि गल्फ – आखाती देशात पोहोचवण्याचे काम या प्रसारमाध्यमांनी केले आहे. त्यांच्यामुळेच कृष्णाचा खेळ पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळाली. या सर्वांचे आभार कृष्णा सातपुते वेळोवेळी मानत असतो हे आपल्या सर्वांना परिचितच आहे.

कृष्णाचे कार आणि बाईक कलेक्शन         (krishnas car and bike collection)

एकेकाळी गरजेच्या वेळी शेजारच्या कडे कार आणि बाईक साठी बोलणी खाणारा, बिगारी काम करणारा, वेळप्रसंगी भंगार चोरून विकणाऱ्या कृष्णाकडे आज वीस पेक्षा जास्त टू व्हीलर व चार फोर व्हीलर गाड्या आहेत. हे सर्व काही शक्य झालं आहे ते फक्त क्रिकेटमुळेच. 2010 मध्ये त्यांनी सर्वप्रथम प्लॅटिना बाइक जिंकली. तर 2014 मध्ये पहिली फोर व्हीलर कार सेंट्रो त्याला मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आज त्याच्या घरांमध्ये वीस पेक्षा जास्त गाड्या दिमाखात उभ्या आहेत.

हेलिकॉप्टर शॉट आणि कृष्णा 

Helicopter shot 🚁

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी हेलिकॉप्टर शॉट साठी प्रसिद्ध आहेत. तर टेनिस बॉल क्रिकेट मध्ये कृष्णा सातपुते हा हेलिकॉप्टर शॉट साठी ओळखला जातो. समोर कोणताही गोलंदाज असो त्याचा उत्तम प्रकारे टाकलेला यॉरकर  बॉल ही कृष्णा अगदी सहज सीमापार पाठवतो. या हेलिकॉप्टर शॉट द्वारे कृष्णा ने अनेक सामने जिंकून दिलेले आहेत. सध्याच्या घडीला हेलिकॉप्टर शॉट म्हणजेच’ कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका ‘अशी ओळख निर्माण झाली आहे.

FAQ –

  • कृष्णा सातपुते कोणाला आपला रोल मॉडेल मानतो?

उत्तर – संजय नागटिळक ( मध्य प्रदेश ).

  • कृष्णा सातपुते चा टेनिस क्रिकेट मधील आदर्श खेळाडू कोण आहे ?

उत्तर – उमेश मांजरेकर सर (कोल्हापूर ).

  • कृष्णा सातपुते च्या मते टेनिस क्रिकेटमधील त्याला सर्वात कठीण वाटणारा गोलंदाज कोण होते?

उत्तर – कै. संदीप दाभाडे, सतीश पठारे  आणि भावेश पवार

  • सध्याच्या घडीतील कृष्णा सातपुते चा सर्वात आवडता फलंदाज कोण आहे. ?

उत्तर – बबलू पाटील.

  • सध्याच्या घडीतील कृष्णा सातपुतेचा सर्वात आवडता गोलंदाज कोण आहे?

उत्तर – तुकाराम गुंजे.

  • कृष्णा सातपुते चा सर्वात आवडता क्रिकेट शॉट कोणता आहे ?

उत्तर – हेलिकॉप्टर शॉट, बैठक शॉट आणि लोफ्टेड स्ट्रेट शॉट.

  • कृष्णा सातपुते चा सगळ्यात आवडता फॅन कोण आहे ?

उत्तर – अतुल थोरात ( खेडगाव ) आणि किशोर मदने ( पुसेगाव ).

निष्कर्ष 

कृष्णाने आपल्या फलंदाजीने चाहत्यांना आकर्षीत केलेच. परंतु त्याबरोबर त्याने भारतीय संघाचे दिग्गज खेळाडूंना सुद्धा आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडले. सचिन  तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग सारख्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंनी कृष्णाचा खेळ पाहिला आहे. तसेच त्याचे तोंड भरून कौतुक सुद्धा केले आहे. टेनिस क्रिकेटला नवीन ओळख मिळवून देण्यामध्ये नक्कीच कृष्णा सातपुते याचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच त्याचा खेळ पाहण्यासाठी चाहते लांब लांबून मैदानामध्ये आपली उपस्थिती दर्शवतात. तुम्ही कृष्णाचा सातपुते याचा खेळ पाहिला आहे. पाहिला असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या खेळाडूची माहिती सर्वांना व्हावी म्हणून जास्तीत जास्त शेअर सुध्दा करा.

हे ही वाचा –

Vijay Pavale: The Sangli Express Biography

Leave a Comment